वैध परवाना नसताना अवाजवी शुल्क वसुलीचा आरोप; नगरसेवक शरद जंगटे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव येथील काही ऑनलाइन सेवा केंद्रांमध्ये शासनाचा वैध कर्नाटक वन (Karnataka One) किंवा ग्राम वन (Grama One) परवाना नसतानाही नागरिकांकडून विविध शासकीय सेवांसाठी अवाजवी शुल्क आकारून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक शरद जंगटे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित ऑनलाइन सेंटरची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, नवीन रेशन कार्ड मंजूर करून देण्याच्या नावाखाली तब्बल १० हजार रुपये, वृद्धापकाळ व विधवा पेन्शन सुरू करून देण्यासाठी ५ हजार रुपये, जातीचा दाखला व इतर प्रमाणपत्रांसाठी २ हजार रुपये, तर बसपास करून देण्यासाठी ३०० रुपये इतकी अवाजवी रक्कम नागरिकांकडून घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शासकीय ऑनलाइन अर्जांसाठी शासनाने निश्चित केलेले अधिकृत शुल्क साधारण २० ते ५० रुपयांच्या दरम्यान असताना काही ऑनलाइन सेंटर चालक नागरिकांकडून त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक रक्कम आकारत असल्याने ही गोरगरीब जनतेची उघड आर्थिक लूट असल्याचा आरोप जंगटे यांनी केला आहे.
याशिवाय, संबंधित ऑनलाइन सेवा केंद्रांमध्ये विविध सेवांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काची अधिकृत यादी किंवा माहिती फलक प्रदर्शित केलेला नसल्याने नागरिकांची फसवणूक अधिक सुलभ होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात काही संबंधित अधिकाऱ्यांवर व्यवहारिक दबाव आणल्याचाही आरोप करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासन, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बोरगावमधील महिला वर्गासह नागरिकांकडून होत आहे.
