Top News

शिवनाकवाडीत बेकायदा मावा विक्रीवर पोलिसांचा छापा

कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :

कुरुंदवाड पोलिसांनी शिवनाकवाडी येथील एका पानटपरीवर छापा टाकून बेकायदा मावा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ३० मावा पुड्या जप्त करण्यात आल्या असून संबंधिताविरुद्ध सिगारेट अँड टोबॅको प्रॉडक्ट्स (COTPA) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हंबीरराव पाटील (वय ३५, रा. शिरदवाड, ता. शिरोळ) हा शिवनाकवाडी गावाच्या हद्दीतील हॉटेल बॉर्डर ढाबा येथील राधे पान शॉपमध्ये बेकायदेशीरपणे मावा तयार करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि. १४ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपी सुगंधी तंबाखू, सुपारी, आवळा, रसवा पावडर व इतर पदार्थांचे मिश्रण करून तयार केलेल्या माव्याच्या पुड्या कोणतेही लेबल किंवा आरोग्यविषयक वैधानिक इशारा न देता विक्री करताना आढळून आला. या कारवाईत २० रुपये किमतीच्या प्रत्येकी ३० मावा पुड्या, असा एकूण ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश सर्जेराव भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस नाईक पवार यांनी केली असून, पुढील तपास पोलीस नाईक भातमारे करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने