जयसिंगपूर । शिवार न्यूज़ नेटवर्क
जयसिंगपूर शहरातील दोन पानटपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून बेकायदा सुगंधी तंबाखू व त्यापासून तयार केलेला मावा जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी विलास म्हस्के (वय २८, रा. जयसिंगपूर) आणि चंद्रकांत बाबुराव दुर्डे (वय ५४, रा. जयसिंगपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १३ जुलै रोजी दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास सनसिटी हॉटेलसमोरील असलेल्या बालाजी म्हस्के यांच्या पानटपरीवर छापा टाकण्यात आला. तेथून सुगंधी तंबाखूपासून तयार केलेल्या २१ मावा पुड्या तसेच सुमारे २ किलो मावा असा एकूण ३,०८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर गल्ली क्रमांक १० मधील सुरभी पान शॉप येथे कारवाई करण्यात आली. तेथून ९१ मावा पुड्या व ३ किलो सुगंधी तंबाखू असा २,८७० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५,९५६ रुपयांचा बेकायदा सुगंधी तंबाखू व मावा जप्त करण्यात आला आहे. संबंधितांनी कोणताही वैध परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने हा साठा बाळगल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
