कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड पोलिसांनी आलास-जुगूळ मार्गावरील एका कल्याण मटका अड्ड्यावर छापा टाकून जुगार चालविणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि मोबाईल असा १६ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवि लिंगाप्पा चलवादी (वय ३९, रा. नृसिंहवाडी, ता. शिरोळ) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून बेकायदा कल्याण मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार मंगळवारी (दि. १४ जुलै) दुपारी १.१० वाजण्याच्या सुमारास आलास ते जुगूळ रोडलगत असलेल्या न्यू पॅलेस बिअर बारच्या आडोशाला पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपी लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटक्याचे आकडे स्वीकारताना आढळून आला.
यावेळी पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून २ हजार ८३० रुपये रोख रक्कम, जुगाराचे आकडे लिहिलेला कागद, निळ्या शाईचे बॉलपेन तसेच १४ हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी एफ मॉडेलचा मोबाईल असा एकूण १६ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन विठ्ठल हळदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस नाईक पवार यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सानप करीत आहेत.
