कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड पोलिसांनी दानवाड येथे कारवाई करत बेकायदा विक्रीसाठी ठेवलेला देशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीमंत कांबळे (वय ३९, रा. बेरड गल्ली, दानवाड, ता. शिरोळ) याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणताही वैध परवाना नसताना देशी दारू विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार मंगळवारी (दि. १४ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास नवे दानवाड गावाच्या हद्दीत एसटी स्टँडच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून रेठरे संत्रा कंपनीच्या ९० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या ६८ सिलबंद प्लास्टिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ हजार ७२० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश सर्जेराव भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस नाईक पवार यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कराडे करीत आहेत.
