हेरवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
आषाढी एकादशीचे औचित्य साधत हेरवाड येथील कुमार विद्या मंदिरात पारंपरिक वारकरी संस्कृतीचा जागर करत विद्यार्थ्यांच्या सहभागातून भक्तिमय दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या निनादात, "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत आणि वारकरी यांची आकर्षक वेषभूषा परिधान करून सहभाग घेतला. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवी पताका, टाळ-चिपळ्या आणि मुखी विठ्ठलाचे नाम घेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वारकरी परंपरेचे दर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. छोट्या-छोट्या वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव पाहून उपस्थित नागरिकांनाही पंढरपूरच्या वारीचा अनुभव मिळाला.
विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेत विठ्ठल नामाचा गजर केला. नामस्मरणामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण भक्तिमय झाले होते. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. वारकरी संप्रदायातील समता, सेवा, भक्ती आणि सदाचाराचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
मुख्याध्यापक शामराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी दिंडीचे नियोजन केले.
या भक्तिमय दिंडीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची ओळख तर झालीच, शिवाय वारकरी संप्रदायाचे संस्कार प्रत्यक्ष अनुभवण्याची संधीही मिळाली. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांनीही मनापासून कौतुक केले.
