Top News

राष्ट्रीय गोमाता सन्मान दिनानिमित्त कुरुंदवाडमध्ये गोशाळेचे उद्घाटन व भव्य गोमाता मिरवणूक

कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :

रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळ, कुरुंदवाड यांच्या वतीने राष्ट्रीय गोमाता सन्मान दिनानिमित्त सोमवार, दि. २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता गोशाळेचे उद्घाटन, गोमाता पूजन आणि भव्य गोमाता मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा गोरक्षक रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांच्या हस्ते गोशाळेचे उद्घाटन, महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गोमाता पूजन होणार आहे. महाराष्ट्र राज्य, तर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते स्वागत कमानीचे पूजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आरोग्य राज्यमंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर राहणार आहेत. तसेच आमदार सदाभाऊ खोत, आमदार अमल महाडीक, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, कुरुंदवाड नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा तथा स्वागताध्यक्ष मनिषा उदय डांगे आणि महाराष्ट्र राज्य धनगर समाज युवक संघाचे अध्यक्ष घनश्याम (बापू) हाके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाच्या परिसरात, कुरुंदवाड नगरपालिका चौक येथे हा कार्यक्रम होणार असून, गोसंवर्धन आणि गोसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गोमाता पूजनासह भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोरक्षक रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत केले.

या पत्रकार परिषदेस रामदासबापू मधाळे, नगरसेवक वैभव उगळे, बाबासाहेब भुजुगडे, जय कडाळे, अक्षय आलासे, दीपक पोमाजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने