Top News

आलासमध्ये मावा विक्रीवर सलग दोन कारवाया

कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवार (दि. २३ जुलै) रोजी शिरोळ तालुक्यातील आलास येथे बेकायदा मावा विक्रीविरोधात धडक कारवाई करत दोन पानटपऱ्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण ७७ माव्याच्या पुड्या जप्त करण्यात आल्या असून, दोघांविरुद्ध सिगारेट अँड टोबॅको प्रॉडक्ट्स अॅक्ट, २००३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पोलीस शिपाई अविनाश सर्जेराव भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहिली कारवाई सकाळी १०.२० वाजता आलास येथील दर्गा चौकासमोरील आरफा पान शॉप येथे करण्यात आली. यावेळी झाकीर फरीद शिकलगार (रा. रामनगर, आलास) याच्याकडून ३४ माव्याच्या पुड्या (किंमत ६८० रुपये) जप्त करण्यात आल्या.

त्यानंतर दुपारी १२.३० वाजता त्याच परिसरातील मिलन पान शॉप येथे छापा टाकून सरताज मिरासाहेब शिकलगार (रा. रामनगर, आलास) याच्याकडून ४३ माव्याच्या पुड्या (किंमत ८६० रुपये) जप्त करण्यात आल्या.

दोन्ही आरोपी सुगंधी तंबाखू, सुपारी, आवळा रस व इतर पदार्थांचे मिश्रण करून कोणतेही लेबल किंवा वैधानिक आरोग्य इशारा न देता मावा विक्री करत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाले. दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने