जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक ३, पार्श्व प्लाझा परिसरात ड्युप्लिकेट चावीचा वापर करून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी (२३ जुलै) उघडकीस आली. याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संजय बापुसो कांबळे (वय ५०, व्यवसाय नोकरी, सध्या रा. गल्ली क्र. ३, पार्श्व प्लाझा, जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप ड्युप्लिकेट चावीच्या सहाय्याने उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी तिजोरीमध्ये लॉक न करता ठेवलेली ६० हजार रुपयांची रोकड (५०० रुपयांच्या १२० नोटा) चोरून नेली.
या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बोजगर यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक अन्नछत्रे पुढील तपास करीत आहेत.
