संसारोपयोगी भांडी आणि धान्याची केली मदत
तेरवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील गंगापूर उपनगरात शॉर्टसर्किटमुळे आयुब युसूफ बेपारी यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीची आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच या कुटूंबाला एक महिना पुरेल इतके धान्य व संसारपयोगी भांड्याचा संच दिला.
बुधवारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील मुलीच्या प्रसूतीसाठी ठेवलेली ९० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे, फर्निचर व अन्य संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अग्निशमन कर्मचारी नितीन संकपाळ व हेमंत वायचळ यांनी प्रसंगावधान राखत घरातील गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढला. तसेच छतावरील पत्रे काढून पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणल्याने शेजारील घरांचे संभाव्य नुकसान टळले होते.
घटनास्थळी आमदार डॉ. यड्रावकर यांनी बेपारी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शासनाच्या सर्व नियमांनुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी शाबगोंड पाटील, उमेश आवळे, बेपारी कुटूंबिय प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
