Top News

कुरुंदवाडच्या नव्या पाणीपुरवठा योजनेस ४९ कोटींची प्रशासकीय मंजुरी : आमदार यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश

कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या तब्बल बारा वर्षांपासून रखडलेल्या कुरुंदवाड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. शहरवासीयांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणाऱ्या नव्या पाणीपुरवठा योजनेस राज्य शासनाने ४९ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या कुरुंदवाडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, नगरसेवक अक्षय आलासे, जय कडाळे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.

कुरुंदवाड शहराची जुनी पाणीपुरवठा योजना मागील १२ वर्षांपासून रखडलेली होती. संबंधित ठेकेदाराने केवळ १५ टक्के काम पूर्ण केल्याने योजना अक्षरशः ठप्प झाली होती. परिणामी शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेशा पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत होते. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी विधानसभा तसेच नगरपालिका निवडणुकीदरम्यान शहराला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनाची पूर्तता करत केली आहे. सन २०४८ सालची लोकसंख्या गृहीत धरून नवीन ४९ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणर आहे.

योजनेला मंजुरी मिळाल्याची बातमी शहरात पोहोचताच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विविध भागांत फटाक्यांची आतषबाजी करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. अनेक नागरिकांनी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या योजनेमुळे कुरुंदवाड शहराला भविष्यात शुद्ध, नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून, शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने कुरुंदवाडकरांच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक ठरत आहे. शहराला पाणीपुरवठा मंजूर केल्याबद्दल शहरवासीयातून आमदार यड्रावकर यांचे आभार मानले जात आहेत.

थोडे नवीन जरा जुने