कुरुंदवाडच्या लायन्स क्लबच्या अत्याधुनिक दंतचिकित्सा केंद्राचे उत्साहात उद्घाटन
कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
"गेल्या ४० वर्षांपासून लायन्स क्लब कुरुंदवाडने अंधत्व निवारणासह गोरगरिबांच्या आरोग्यसेवेसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागात ५० खाटांचे नेत्ररुग्णालय उभारून लाखो रुग्णांना सेवा देणाऱ्या या संस्थेने आता दंतचिकित्सा केंद्र सुरू करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून येथे दर्जेदार सेवा मिळणार असून हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
लायन्स क्लब कुरुंदवाड व लायन्स क्लब्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक दंतचिकित्सा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. मनीषा डांगे होत्या.
यावेळी प्रथम उपप्रांतपाल लायन डॉ. किरण खोराटे, प्रांतपाल लायन विजयकुमार राठी, माजी प्रांतपाल लायन अण्णासाहेब गळतगे, लायन वासुदेव कलघटगी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की, लायन्स आय हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत सुमारे तीन लाख रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली असून ५५ हजारांहून अधिक नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. या सेवेमुळे संस्थेने राज्यभर नावलौकिक मिळवला आहे. आता दंतचिकित्सा केंद्रामुळे दातांच्या रुग्णांनाही अत्याधुनिक व परवडणारी उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे.
अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष सौ. मनीषा डांगे यांनी लायन्स क्लबच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत, समाजाचे ऋण फेडण्याचे काम ही संस्था सातत्याने करत आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी प्रांतपाल लायन विजयकुमार राठी, माजी प्रांतपाल लायन अण्णासाहेब गळतगे, लायन वासुदेव कलघटगी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी प्रांतपाल लायन सुनील सुतार यांनी स्वागत केले. माजी अध्यक्षा अर्चना सुतार यांनी ध्वजप्रार्थना सादर केली. लायन रविकिरण गायकवाड यांनी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. झोन चेअरमन डॉ. सुनील चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले, तर सूत्रसंचालन लायनेस धनश्री गायकवाड (झोन चेअरमन) यांनी केले.
मान्यवरांचा सत्कार लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. ए. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दंतचिकित्सा केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी, लायन्स आय हॉस्पिटलचा स्टाफ, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील मोहिते, माजी नगराध्यक्ष रामचंद्र (तात्या) डांगे, रावसाहेब पाटील, नगरसेवक जवाहर पाटील, शब्बीर बागवान, अली बागवान, अक्षय आलासे, रमेश (अण्णा) भुजुगडे, तानाजी आलासे, विशाल पाटील, दादासाहेब पाटील तसेच शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार लायन बी. एस. पाटील यांनी मानले.
