Top News

देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाची दुचाकी मंदिरासमोरून लंपास

Ai फोटो

कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाची मंदिरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी तब्बल तीन महिन्यांनंतर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश रविंद्र गोरवाडे (वय ३५, रा. ममदापूर, ता. निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक) हे २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांचे काका संजय गोरवाडे यांच्या मालकीची हिरो होंडा फॅशन कंपनीची काळ्या रंगाची, निळा पट्टा असलेली (क्रमांक KA-23L-3553) मोटारसायकल घेऊन अब्दुललाट येथील श्री महालक्ष्मी मंदिरात देवदर्शनासाठी आले होते.

मंदिरासमोर दुचाकी उभी करून ते दर्शनासाठी गेले. दर्शन करून परत आल्यानंतर त्यांनी दुचाकी शोधली असता ती जागेवर आढळून आली नाही. अज्ञात चोरट्याने संधी साधून सुमारे ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी राकेश गोरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक भातमारे करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने