शिरोळ । शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानदारांना गेल्या पाच महिन्यांपासून शासनाकडून मिळणारे कमिशन अदा करण्यात आले नसल्याने दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून आजअखेर कमिशन जमा न झाल्यामुळे दुकानाचा खर्च भागवणे कठीण झाले असून शासनाने तातडीने थकीत कमिशन जमा करावे, अशी मागणी रास्त भाव धान्य दुकानदारांकडून होत आहे.
शिरोळ तालुक्यात सुमारे १४० सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकाने कार्यरत आहेत. या दुकानांमार्फत अंत्योदय व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना गहू व तांदूळ मोफत वितरित केला जातो. या धान्य वितरणाच्या बदल्यात शासनाकडून दुकानदारांना प्रतिक्विंटल १७० रुपये कमिशन दिले जाते. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून हे कमिशन न मिळाल्याने दुकानदारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
एका दुकानदाराला दरमहा साधारणपणे १० ते १५ हजार रुपये कमिशन मिळते. त्याच रकमेतून दुकानाचे भाडे, वीजबिल, मापाडीचा पगार तसेच इतर प्रशासकीय खर्च भागवावा लागतो. कमिशन वेळेवर न मिळाल्यामुळे हे सर्व खर्च स्वतःच्या खिशातून करावे लागत असल्याने दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दुकानदारांनी शासनाकडे महिन्याच्या महिन्याला कमिशन जमा करण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. तसेच पूर्वी सुरू असलेली 'आनंदाचा शिधा' योजना पुन्हा सुरू करावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. या योजनेत साखर, खाद्यतेल, तूरडाळ, हरभरा आणि रवा यांचे वितरण होत असल्याने दुकानदारांना काही प्रमाणात अतिरिक्त कमिशन मिळत होते.
थकीत कमिशन तातडीने अदा करून रास्त भाव धान्य दुकानदारांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
