पुणे । शिवार न्यूज नेटवर्क :
पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने समाजहिताचे प्रश्न मांडत विश्वासार्ह कामगिरी करणाऱ्या 'प्रेस मीडिया लाईव्ह' या वृत्तसंस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त २७ डिसेंबर २०२६ रोजी पुणे येथे भव्य राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या सोहळ्यात गौरव केला जाणार असून, पुरस्कारासाठी नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण, संयमी आणि समाजाभिमुख कार्य करत प्रेस मीडिया लाईव्हने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेने **'इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये सलग तीन जागतिक विक्रमांची नोंद करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. याशिवाय 'कर्नाटक अचिव्हर्स बुक ऑफ रेकॉर्ड' या प्रतिष्ठित संस्थेकडूनही आंतरराज्य पुरस्काराने गौरविण्यात आल्याने संस्थेच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, वैद्यकीय, पत्रकारिता, कला, चित्रपट, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. पारदर्शक आणि न्याय्य निकषांवर पुरस्कारार्थींची निवड केली जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
संस्कृतीची राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात होणाऱ्या या सोहळ्यास दोन्ही राज्यांतील मान्यवर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक, कलाकार, चित्रपटसृष्टीतील मान्यवर, समाजसेवक आणि ज्येष्ठ पत्रकार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी, कर्तृत्व आणि महाराष्ट्र-कर्नाटक मैत्रीचा अनोखा उत्सव ठरणार आहे.
या राष्ट्रीय सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील 'शिवार न्यूज' ही वृत्तसंस्था मीडिया पार्टनर म्हणून सहकार्य करत असून, 'शिवार न्यूज'चे संपादक संतोष तारळे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. ही माहिती प्रेस मीडिया लाईव्हचे संपर्क अधिकारी फिरोज मुल्ला यांनी दिली.
