Top News

हिप्परगी बॅरेजची सर्व गेट तातडीने उघडा; आंदोलन अंकुश संघटनेची मागणी



शिरोळ । शिवार न्यूज नेटवर्क  :

सततच्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असताना, संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजची सर्व गेट तातडीने उघडावीत, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी सांगली येथील कृष्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले असून, त्यानंतर पाटबंधारे विभागाने कर्नाटक पाटबंधारे खात्याशी संपर्क साधत पत्रव्यवहार सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी १ जूनपूर्वी हिप्परगी बॅरेजची सर्व गेट उघडण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ती पूर्णपणे राबविण्यात आली नव्हती. आता गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रासह कर्नाटकातील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीच्या दिशेने जात असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

संघटनेने पुढे म्हटले आहे की, आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, जनजीवनाचे आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी हिप्परगी बॅरेजची सर्व गेट तात्काळ वर घेण्याबाबत कर्नाटक सरकारला सूचना कराव्यात. आवश्यक असल्यास मंत्रीस्तरावर चर्चा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात, वेळेत आवश्यक कार्यवाही न झाल्यास आणि त्यातून पूरस्थिती निर्माण होऊन नुकसान झाल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, आंदोलन अंकुश संघटनेच्या मागणीनंतर सांगली कृष्णा पाटबंधारे विभागाने कर्नाटक पाटबंधारे खात्याला यासंदर्भात पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली असून, पुढील निर्णयाकडे नदीकाठच्या गावांतील नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

थोडे नवीन जरा जुने