Top News

कोल्हापूर जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ५२.८ मि.मी. पाऊस; ३१ बंधारे पाण्याखाली, प्रशासन सतर्क

 


कोल्हापूर । शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ५२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १४३.१ मि.मी. पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली गेले असले, तरी प्रमुख नद्यांची पाणीपातळी अद्याप इशारा पातळीखाली असून जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, गगनबावड्यानंतर भुदरगड (८५.९ मि.मी.), राधानगरी (८१ मि.मी.), आजरा (६७.६ मि.मी.), चंदगड (६५.३ मि.मी.), कागल (६०.२ मि.मी.), पन्हाळा (५८.३ मि.मी.), शाहूवाडी (४६.९ मि.मी.), गडहिंग्लज (४३.४ मि.मी.), करवीर (४०.१ मि.मी.), हातकणंगले (२०.९ मि.मी.) आणि शिरोळ (१६.८ मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे.

रेल्वे वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत आहे. मात्र अतिवृष्टीमुळे २ राज्यमार्ग, २ प्रमुख जिल्हा मार्ग, २ ग्रामीण मार्ग आणि १ इतर जिल्हा मार्ग असे एकूण ७ रस्त्यांवरील वाहतूक बाधित झाली आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी राजाराम बंधारा येथे २८ फूट ३ इंच, शिरोळ बंधारा येथे ३६ फूट आणि नृसिंहवाडी येथे ३१ फूट असून तिन्ही ठिकाणी पाणी इशारा पातळीखाली आहे.

दरम्यान, राधानगरी धरणात ३२ टक्के, तुळशी धरणात ३८ टक्के, वारणा धरणात २४ टक्के आणि दूधगंगा धरणात ८ टक्के पाणीसाठा आहे. वारणा आणि दूधगंगा धरणातून प्रत्येकी १०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात अद्याप कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्याची गरज भासलेली नसून, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, महसूल, पोलीस आणि संबंधित सर्व यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

थोडे नवीन जरा जुने