कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
मुलगी झाल्याच्या कारणावरून वारंवार मानसिक व शारीरिक छळ करत पैशांसाठी तसेच दागिन्यांसाठी माहेरहून मागणी केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रणिता विनायक परीट (वय 33, व्यवसाय – शिक्षिका, रा. ग्रामपंचायतजवळ, मजरेवाडी, ता. शिरोळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विनायक बापुसो परीट (वय 33), सासू संगीता बापुसो परीट (वय 50) आणि सासरे बापुसो आण्णाप्पा परीट (वय 60, सर्व रा. मजरेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून 2021 पासून ते 22 जुलै 2026 पर्यंत मजरेवाडी येथील सासरी फिर्यादीचा छळ करण्यात आला. फिर्यादीला मुलगी झाल्यानंतर त्याच कारणावरून आरोपी वारंवार वाद घालत होते. शिक्षक पतसंस्थेतून 20 लाख रुपयांचे कर्ज काढून दिले नाही म्हणून शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
तसेच, "नणंदेचा मुलगा दत्तक घे, अन्यथा दोन्ही मुलींना घेऊन घरातून निघून जा, आमच्या मुलाचे दुसरे लग्न करतो," अशी धमकी आरोपींकडून दिली जात होती. याशिवाय माहेरहून पैसे व दागिने आणण्यासाठी वारंवार दबाव टाकत मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला तसेच घरातून हाकलून दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून कुरुंदवाड पोलिस ठाण्यात संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक पवार यांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस नाईक भातमारे करीत आहेत.
