Top News

नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका; अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ : अतिश शिंगे

 संदीप कोले । शिवार न्यूज नेटवर्क

हातकणंगले तालुक्यातील हेरले गावात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत, नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका मांडली.

गावात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरणकडून सुरू असलेल्या हालचालींची माहिती मिळताच अतिश शिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी महावितरणच्या हेरले विभागाच्या कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) प्रियांका सूर्यवंशी व संबंधित कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली.

यावेळी अतिश शिंगे म्हणाले, "स्मार्ट मीटरबाबत शासनाचे धोरण, त्याचे फायदे-तोटे आणि नागरिकांच्या शंकांचे प्रथम निरसन झाले पाहिजे. लोकांना विश्वासात न घेता किंवा त्यांच्या मनाविरुद्ध कोणत्याही घरात स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल.

तसेच, नागरिकांचा विश्वास संपादन करूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी महावितरण प्रशासनाकडे केली.

दरम्यान, गावकऱ्यांनीही स्मार्ट मीटरबाबत विविध शंका उपस्थित करत सक्तीने मीटर बसविण्यास विरोध दर्शविला. यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाच्या नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

या घटनेमुळे स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, नागरिकांना विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घ्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

यावेळी सयाजी गायकवाड, कुमार हराळे, आनंदा गवळी, बाबासो रुईकर, बाळासाहेब भाई, अरुण परमाज यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने