शिरोळ | शिवार न्यूज नेटवर्क
श्री दत्त साखर कारखाना, शिरोळ येथे सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असून, आगामी हंगामातील मिल रोलर पूजन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी बोलताना गणपतराव पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासदांनी आपला संपूर्ण ऊस श्री दत्त साखर कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, तसेच ऊस तोडणी व वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात करार करून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
गळीत हंगाम सुरळीत आणि वेळेत सुरू करण्यासाठी कारखान्यातील सर्व यंत्रसामग्रीची देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असून, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांशी करार करण्याची तसेच त्यांना उचल रक्कम देण्याची प्रक्रियाही सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाइस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, रणजित कदम, इंद्रजित पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, ॲड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू माने-गावडे, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, प्रदीप बनगे, बाळासाहेब पाटील (हालसवडे), रावसाहेब नाईक, मंजूर मेस्त्री, कार्यकारी संचालक संजीव देसाई, सचिव अशोक शिंदे, वर्क्स मॅनेजर एस. ए. चौगुले, प्रोडक्शन मॅनेजर एम. एस. जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
मिल रोलर पूजनानंतर उपस्थितांनी आगामी गळीत हंगाम यशस्वी व विक्रमी करण्याचा संकल्प व्यक्त केला. कारखान्याने वेळेत तयारी पूर्ण केल्याने यंदाचा गळीत हंगाम सुरळीत पार पडेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
