हैदरअली मुजावर । शिवार न्यूज नेटवर्क :
परिसरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून शिरढोण–कुरुंदवाड पुलावर तसेच शिरढोण–नांदणी रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने संबंधित मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नदीकाठावरील व सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुराच्या परिस्थितीमुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी काही मार्गांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
