अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले, निपाणी मतदारसंघाच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हालशुगरचे संचालक व नगरसेवक शरदराव जंगटे यांच्या पुढाकाराने कार्यरत असलेल्या आचार्य श्री १०८ शांतीसागर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., बोरगावच्या विस्ताराचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जात असून, संस्थेच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मांगुर येथे होणार आहे.
हा उद्घाटन सोहळा अभिनव प. पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात संपन्न होणार असून, या कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, बसव युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक शरदराव जंगटे यांनी सांगितले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, शेतकरी, छोटे व्यावसायिक तसेच गरजू नागरिकांना विश्वासार्ह आणि सुलभ आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बोरगाव येथे आचार्य श्री १०८ शांतीसागर को-ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली. सभासदांचा विश्वास, ठेवीदारांचे सहकार्य, संचालक मंडळाचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे संस्थेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून, त्याचाच परिणाम म्हणून मांगुर येथे दुसरी शाखा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या नवीन शाखेमार्फत शेतकरी, लघु उद्योजक, महिला बचत गट, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या कर्जसुविधा, ठेवी योजना तसेच इतर आर्थिक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत राहणार असल्याचा विश्वासही जंगटे यांनी व्यक्त केला.
मांगुर शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास सभासद, ठेवीदार, हितचिंतक, व्यापारी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक शरदराव जंगटे यांनी केले आहे.
