Top News

शिरोळ तालुक्यात २८ हजार ८८८ बालकांना पोलिओचा डोस

शिरोळ । शिवार न्यूज नेटवर्क :

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनिमित्त शिरोळ तालुक्यात रविवारी एकूण २८ हजार ८८८ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. मोहिमेचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले.

सहाय्यक संचालक आरोग्य सेवा, मुंबई डॉ. अपर्णा गावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पडली.

प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लसीकरणात नांदणी येथे सर्वाधिक ४,३१६, उदगाव येथे ३,३८४, दानवाड येथे ३,२१८, अर्जुनवाड येथे ३,००२, शिरटी येथे २,८०१, कोथळी येथे २,७९१, टाकवडे येथे २,४९८, जैनापूर येथे २,३७०, कवठेसार येथे १,४०७ आणि शिरढोण येथे ९४२ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला.

या मोहिमेसाठी तालुक्यात ४५ लसीकरण केंद्रे, ५१ ट्रान्झिट बूथ, ११ मोबाईल पथके कार्यरत होती. आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच स्वयंसेवक यांनी घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिरोळ तालुक्यातील पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी दिली.

थोडे नवीन जरा जुने