हेरवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायतीच्या निष्काळजी कारभारामुळे गावातील स्मशानभूमीत आजही मूलभूत सुविधांचा अभाव असून, रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अक्षरशः अंधारात दहनविधी उरकावा लागत आहे. स्मशानभूमीत वीजपुरवठा व लाईटची कोणतीही व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावालगत नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत रात्री एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना मोबाईलच्या टॉर्च, वाहनांचे हेडलाईट किंवा इतर तात्पुरत्या प्रकाशाच्या साधनांचा आधार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करणे अत्यंत धोकादायक आणि मनस्तापदायक ठरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
स्मशानभूमीसारख्या अत्यावश्यक ठिकाणी प्रकाशयोजनेसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असतानाही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध विकासकामांवर लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना, मृतांच्या अंतिम संस्कारासाठी आवश्यक असलेली ही साधी सुविधा उपलब्ध करून न देणे हे ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभाराचे द्योतक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत अंधार, चिखल आणि नदीकाठचा परिसर यामुळे धोका अधिक वाढतो. अशा वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
स्मशानभूमीत तातडीने वीजजोडणी करून उच्च क्षमतेचे एलईडी दिवे बसवावेत, तसेच परिसरात कायमस्वरूपी प्रकाशयोजना करावी, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. ग्रामपंचायतीने याबाबत तातडीने कार्यवाही करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
