कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
स्वातंत्र्यसैनिक श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत २ कोटी ३५ लाख ९१ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला असून, सभासदांना १० टक्के लाभांश तातडीने देण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील यांनी केली.
कुरुंदवाड येथील जैन संस्कृती भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बँकेच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन प्रदीप पाटील बोलत होते. सभेला सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
प्रदीप पाटील म्हणाले, "रिझर्व्ह बँकेच्या नियम व अटींनुसार बँकेचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. बँकिंग क्षेत्रात सातत्याने नवनवीन बदल होत असून, त्या बदलत्या आव्हानांचा समर्थपणे सामना करत सभासदांच्या विश्वासाच्या बळावर बँकेने प्रगतीची वाटचाल कायम ठेवली आहे. ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी कस्टमर फ्रेंडली बँक म्हणून कार्यरत राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. सभासदांच्या ठेवींची सुरक्षितता ही बँकेची सर्वोच्च जबाबदारी असून, ठेवीदार, कर्जदार, सभासद आणि बँक कर्मचारी यांच्यातील उत्तम कार्यसंस्कृती हीच बँकेच्या यशाची खरी ताकद आहे.
यावेळी माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक अरुण आलासे यांनी सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "सहकार क्षेत्र अधिक सक्षम करायचे असेल आणि सर्वसामान्य माणसाची आर्थिक प्रगती साधायची असेल, तर काळानुरूप बदल स्वीकारणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करत ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची प्रगती सुरू आहे. सहकार टिकला तरच सर्वसामान्य माणूस टिकेल. शेतकरी, उद्योजक आणि युवा सभासदांना उद्योग-व्यवसायासाठी सक्षम करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत."
सभेदरम्यान बँकेच्या वार्षिक अहवालावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व १६ विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. विषयपत्रिकेचे वाचन बँकेचे व्यवस्थापक राजाराम राहटोळे यांनी केले.
यावेळी रमेश बुजुगडे, दादासाहेब पाटील, अक्षय आलासे, वैभव उगळे, रामचंद्र मोहिते यांच्यासह बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महादेव धनवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बँकेने आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सभासदांचा विश्वास या बळावर सलग प्रगतीची परंपरा कायम ठेवत यंदाही भरीव नफा मिळविल्याने सभासदांनी संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
