Top News

कृषी प्रधान भारतात शेतकऱ्याच्या दावणीतून बैल गायब... यांत्रिकीकरणामुळे बैल पालनाला उतरती कळा

 


अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :

          जगाच्या इतिहासात भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, शिवाय एकेकाळी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीत बैलांची जोडी ही अभिमानाची बाब मानली जात होती. शेतीची मशागत,नांगरणी, पेरणी,वाहतूक अशा सर्व कामांसाठी बैल हेच शेतकऱ्याचे खरे साथीदार होते.मात्र काळाच्या ओघात शेतीत यांत्रिकीकरण वाढल्याने बैलांचे महत्त्व कमी होत गेले असून आज अनेक गावांमध्ये बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान एक बैल तरी असायचा.दुसरा बैल शेजारच्या शेतकऱ्याकडून घेऊन शेतीची मशागत केली जात असे. परंतु आता ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि इतर आधुनिक कृषी अवजारांच्या वापरामुळे शेतीची कामे कमी वेळात आणि अधिक वेगाने होत असल्याने शेतकऱ्यांनी बैल पाळणे जवळपास बंद केले आहे. चाऱ्याची समस्या , वाढीव पशु खाद्य पदार्थ, गगन चुंभी महागाई यामुळे ग्रामीण भागात सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी बैलपालन सोडल्याचे चित्र दिसून येत आहे.

    याचा परिणाम पारंपरिक सण-उत्सवांवरही झाला आहे. पूर्वी बेंदूर सणाच्या मिरवणुकीत सजवलेल्या बैलांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत असत. आज मात्र बैलांची संख्या घटल्याने काही गावांमध्ये "बेंदूर करीसाठी" मानाच्या बैला ऐवजी भाड्याने बैल घेऊन येण्याची वेळ आली आहे. मोजक्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैलांची मिरवणूक काढली जात असल्याचे दिसून येते.

      दरम्यान,पशुखाद्यांच्या वाढलेल्या किमती, वैरणीची कमतरता,जनावरांच्या देखभालीचा वाढता खर्च आणि मजुरांची टंचाई यामुळे बैलपालन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी हा पारंपरिक छंद आणि व्यवसाय सोडून दिल्याचे शेतकरी सांगत आहेत.बैल हे केवळ शेतीचे साधन नसून ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्यामुळे बैलांची घटती संख्या ही केवळ शेतीपुरती मर्यादित नसून ग्रामीण परंपरा आणि संस्कृती साठीही चिंतेचा विषय बनत आहे. त्याकरण पशु संगोपन ही काळाची गरज आहे.

थोडे नवीन जरा जुने