सभासदांनी कर्मवीर पतसंस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे – चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे
कुंभोज । शिवार न्यूज नेटवर्क :
सहकार क्षेत्रातील विश्वासार्ह नाव म्हणून ओळख निर्माण केलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली यांच्या कुंभोज शाखेचे प्रशस्त, सुसज्ज व आधुनिक कार्यालयात स्थलांतर मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना श्रीमती भारती चोपडे यांनी कर्मवीर पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून सामाजिक बांधिलकी आणि सहकार चळवळीची मूल्ये जपत कार्य करणारी लोकाभिमुख संस्था असल्याचे सांगितले. "संस्थेने १२०० कोटी रुपयांहून अधिक ठेवींचा टप्पा गाठला आहे. ही केवळ आकड्यांची प्रगती नसून सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या अढळ विश्वासाची पावती आहे. ग्रामीण भागातील एक संस्था राज्यभर नावारूपाला येणे ही अभिमानाची बाब आहे. भविष्यातही सभासदांनी असाच भक्कम पाठिंबा द्यावा, आम्ही संस्थेचा नावलौकिक अधिक वाढविण्यास कटिबद्ध आहोत," असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर अण्णा तथा संस्थापक स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब चोपडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविकात श्रीमती भारती चोपडे यांनी संस्थेच्या गेल्या ३९ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. सभासदांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे संस्था सर्वसामान्यांच्या विश्वासाचे केंद्र बनली असल्याचे त्यांनी नमूद केले. संचालक मंडळाचे नियोजन, कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि सभासदांची साथ यामुळेच संस्था आज आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भक्कम पायावर उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. एस. पी. मगदूम यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडताना ठेवी, कर्जवाटप, ग्राहकसेवा आणि सामाजिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी कर्मवीर पतसंस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच चेअरमन श्रीमती भारती चोपडे आणि व्हाईस चेअरमन अॅड. एस. पी. मगदूम यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात शाखा सल्लागार श्री. सतीश पाटील, श्री. सुभाष पाटील, श्री. संजय पाटील, श्री. धनपाल कळंत्रे आणि श्री. अशोक पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय शाखाधिकारी श्री. अभिनंदन उपाध्ये, विभागीय अधिकारी श्री. अभिजीत खोत तसेच कार्यालयाच्या सजावटीसाठी योगदान दिलेल्या कु. प्राची कदम यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, शरद साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, कर्मवीर ग्रामीण पतसंस्थेचे संचालक किरण माळी, अभिनंदन पतसंस्थेचे संचालक बाबासाहेब पाटील, प्रकाश पाटील, बलोपंत कुलकर्णी, प्रकाश पाटील रखरखे, शितल कळंत्रे, भरतेश्वर भोकरे, कार्तिक चौगुले, धुधेश्वर इंगलजे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. एस. पी. मगदूम, संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. बजरंग भाऊसाहेब माळी, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे, श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस. बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी केले.
