Top News

शेडशाळ येथे प्रवासी निवारा उभारण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना सचिन बिरणगे यांचे निवेदन

शिरोळ । शिवार न्यूज नेटवर्क :

मौजे शेडशाळ येथील माळभाग परिसरातील मुख्य रस्त्यावरील कमानीजवळ प्रवाशांच्या सोयीसाठी बस पिकअप शेड (प्रवासी निवारा) उभारण्यात यावा, अशी मागणी शेडशाळ परिसरातील नागरिक तथा शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे उपाध्यक्ष सचिन बिरणगे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेडशाळ गावातील माळभाग परिसर तसेच मुख्य रस्त्यालगत असलेल्या कमानीजवळ दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व प्रवासी बसची प्रतीक्षा करीत असतात. मात्र त्या ठिकाणी बस थांब्यासाठी कोणताही प्रवासी निवारा उपलब्ध नसल्याने उन्हाळा, पावसाळा व इतर प्रतिकूल हवामानात नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना उघड्यावर थांबावे लागत असल्याने सुरक्षिततेचा व सोयी-सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी तातडीने बस पिकअप शेड उभारण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन शेडशाळ ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा श्री. सचिन त्यांनी व्यक्त केली आहे.

थोडे नवीन जरा जुने