कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र गोसेवा आयोग व राज्य पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘राज्यमाता गोमाता गोसंवाद यात्रा’ येत्या २७ जून रोजी कोल्हापूर येथे दाखल होणार असून, जिल्ह्यातील गोप्रेमी, गोशाळा चालक, गोसेवक, शेतकरी तसेच सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रामेश्वर गोशाळेचे संस्थापक चेअरमन रामचंद्र डांगे यांनी केले आहे.
देशी गोवंशाचे संवर्धन, गोशाळांचे सक्षमीकरण, गोसेवेबाबत जनजागृती आणि गोआधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही राज्यव्यापी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. २३ जूनपासून सुरू होणारी ही यात्रा राज्यातील विविध जिल्ह्यांतून प्रवास करत ५ जुलै रोजी नागपूर येथे समारोपाला पोहोचणार आहे.
यात्रेदरम्यान गोसंवर्धन, गोशाळा व्यवस्थापन, गोबर व गोमूत्रावर आधारित मूल्यवर्धित उत्पादने, सेंद्रिय शेती, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना तसेच गोशाळांच्या आर्थिक स्वावलंबनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे गोशाळा चालक, शेतकरी आणि गोसेवकांना प्रत्यक्ष तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
कोल्हापूर येथे २७ रोजी सकाळी १०: ३० वाजता पोहोचणाऱ्या राज्यमाता गोमाता संवाद कार्यक्रमात राज्यभरातील गोसेवक, गोशाळा प्रतिनिधी आणि पशुपालक सहभागी होणार असून, गोसंवर्धन क्षेत्रातील विविध अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गोवंश संवर्धन आणि नैसर्गिक शेती यांची सांगड घालणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे रामचंद्र डांगे यांनी सांगितले.
रामचंद्र डांगे म्हणाले, गोमाता ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. गोसंवर्धन आणि गोसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी अशा संवाद यात्रांची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गोशाळा चालक, गोसेवक, शेतकरी व गोप्रेमींनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी के3ले आहे.
