अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव येथे शेतकरी नेते सुनील नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या वतीने खिल्लारी जातीच्या जनावरांचे भव्य प्रदर्शन सोमवार, दि. 29 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे. ही माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तातोबा बसनावर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन आपल्या उत्कृष्ट खिल्लारी बैल, गायी व इतर जनावरे प्रदर्शनासाठी आणावीत, असे आवाहन शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
बोरगाव येथील शिवराय तरुण मंडळ व सहकार भाजीपाला मार्केट परिसरात होणाऱ्या या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश खिल्लारी जातीच्या जनावरांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या पशुपालकांचा गौरव करणे हा आहे. प्रदर्शनामध्ये विविध गटांतील जनावरांचे परीक्षण करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
प्रदर्शनादरम्यान विविध मान्यवरांसह पशुसंवर्धन तज्ज्ञांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. खिल्लारी जातीचे महत्त्व, संगोपन पद्धती आणि आरोग्य व्यवस्थापन याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे खिल्लारी जातीच्या जनावरांच्या संवर्धनाला चालना मिळण्याबरोबरच पशुपालकांना आपल्या जनावरांची गुणवत्ता प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.
पत्रकार परिषदेला शेतकरी नेते सुनील नांगरे पाटील, संघटना अध्यक्ष तात्यासाहेब बसनावर, रमेश मालगावे, अभिषेक पाटील, राजगोंडा पाटील, शिवाजी भोरे, उदय पवार, अभिनंदन फिरगनावर, शीतल सोबाणे, संदीप चिप्रे, आदिनाथ जंगटे, आदिनाथ बसनावर, अभय पाटील, भरत हवले, अण्णासो डकरे, संदीप बसनावर, अमित बसनावर, अमित माळी, प्रकाश मालगावे, बाहुबली हवले, जमील अत्तार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
