अब्दुललाट । शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने "लवकर निदान – लवकर उपचार" या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या एटीएफ (ATF) कॅन्सर आरोग्य तपासणी शिबिराला अब्दुललाट परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दि. १ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, अब्दुललाट यांच्या वतीने आयोजित या विशेष शिबिरात तब्बल २ हजार ७९० नागरिकांची कॅन्सर तपासणी करण्यात आली.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबविण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावांपैकी अब्दुललाट गावाला कॅन्सर तपासणी शिबिरासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. नामांकित कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अतुल देशमुख व त्यांच्या वैद्यकीय पथकाने या शिबिरात सहभाग घेऊन नागरिकांची तपासणी केली.
या शिबिरामध्ये १ हजार ९५० मुख कर्करोग (Oral Cancer) तपासणी नमुने तसेच ८४० गर्भाशय मुख कर्करोग (Cervical Cancer) तपासणी नमुने घेण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना घराजवळच कर्करोग तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने मोठ्या प्रमाणात लाभार्थींनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. कदम, उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच नागरिकांना शिबिराचा लाभ मिळावा यासाठी आरोग्य समिती सदस्य व यड्रावकर फाउंडेशनचे प्रमुख धन्यकुमार चौगुले यांनी पुढाकार घेत महिलांसाठी मळेभाग, रोपवाटिका तसेच गारमेंट उद्योगातील महिला कामगारांसाठी मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली.
या उपक्रमास समाजकल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, शिरोळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, तसेच ग्रामपंचायत अब्दुललाट यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
दरम्यान, शिबिर यशस्वीपणे पार पडल्याबद्दल कै. आप्पा तिप्पाणा चौगुले (साजणे) सोशल युवा फाउंडेशन यांच्या वतीने शिबिरात सहभागी डॉक्टर, आरोग्य अधिकारी, कर्मचारी तसेच आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागात अशा आरोग्यविषयक उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे अनेक नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, हा उपक्रम ग्रामीण आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे.
