Top News

शिरोळ तालुक्यातील गावाकरिता उपसा बंदी शिथिल करण्याची काँग्रेसची मागणी

 


शिरोळ । शिवार न्यूज नेटवर्क : 

पंचगंगा नदीवरील उपसा बंदी आदेशामुळे नदी तीरावरील बहुतांश गावातील शेतकऱ्यांची पिके वाळून आर्थिक नुकसान होणार आहे. पंचगंगा तीरावरील शिरोळ तालुक्यातील गावाकरिता उपसाबंदी शिथिल केल्यास किमान सदरचे पाणी शेतीसाठी वापरून अपव्यय टाळला जाणार आहे. तेव्हा शिरोळ तालुक्यातील गावाकरिता उपसा बंदी शिथिल करून सहकार्य करावे, या आशियाचे निवेदन शिरोळ तालुका काँग्रेस (आय) च्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी व शिरोळ तहसीलदार यांना आज देण्यात आले. 

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या यावर्षीचा मान्सून आगमन लांबणीवर जात असल्याने व अल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने पर्जन्यमानात घट होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, (उत्तर) कोल्हापूर यांच्या आदेशान्वये पंचगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या यंत्रांवर पुढील आदेश येईपर्यंत उपसा बंदी जाहीर करण्यात आली आहे.

पंचगंगा नदीचा प्रवाह इचलकरंजी शहरापासून असून पुढे आल्यानंतर तो शिरोळ तालुक्यात येतो. इचलकरंजीतील प्रोसेस व सांडपाण्यामुळे शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीचा येणारा प्रवाह पूर्णतः प्रदूषित झाला असल्याने शिरोळ तालुक्यातील पंचगंगा तीरावरील कोणत्याही गावात नदीचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. सदरचे पाणी फक्त शेतीसाठी वापरले जाते या नदी तीरावरील गावातील बहुतांश शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेतात. या उपसा बंदीमुळे सदरचे पीक वाळून जाऊन शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होणार आहे. सध्या उपसाबंदी जाहीर केल्याने सदरचे पाणी शेतीसाठी न वापरता त्याचा अपव्यय होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून पंचगंगा तीरावरील शिरोळ तालुक्यातील गावाकरिता उपसाबंदी शिथिल केल्यास किमान सदरचे पाणी शेतीसाठी वापरून अपव्यय टाळला जाणार आहे. तेव्हा वरील बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पंचगंगा तीरावरील शिरोळ तालुक्यातील गावाकरता उपसा बंदी शिथिल करावी आणि सहकार्य करावे, असे या निवेदनाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

या मागणीची माहिती वरिष्ठांना देण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली. यावेळी सदर निवेदन देताना काँग्रेस (आय) चे शिरोळ तालुकाध्यक्ष दरगू गावडे, शिरोळ तालुका काँग्रेस समन्वयक शेखर पाटील तसेच शिरोळचे माजी सरपंच गजानन संकपाळ, शिरोळ शहर तालुकाध्यक्ष धनंजय देसाई, सोशल मीडिया शिरोळ शहर प्रमुख योगेश चुडमुंगे, रणजीत रजपूत यांच्यासह शिरोळ तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने