Top News

कला-क्रीडा मंडळांच्या नावाखाली जुगार अड्ड्यांचे जाळे

भाग - १

 ग्रामीण भागातील युवक भरकटण्याची भीती

शिरोळ । शिवार न्यूज नेटवर्क :

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळांच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोल्हापूर, सांगली आणि परिसरातील अनेक गावांत काही मंडळे सामाजिक व क्रीडा उपक्रमांच्या नावाने नोंदणीकृत असली तरी प्रत्यक्षात त्यांच्या जागांवर मोठ्या प्रमाणात पैशांचे खेळ रंगत असल्याचा आरोप होत आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करताना या संस्थांकडून खेळांना प्रोत्साहन, युवकांना प्रशिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि सामाजिक उपक्रम राबविण्याची उद्दिष्टे नमूद केली जातात. नोंदणी मिळाल्यानंतर संस्थेला अधिकृत स्वरूप प्राप्त होते. मात्र काही ठिकाणी या नोंदणीचा वापर जुगार अड्डे चालविण्यासाठी होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

अशा ठिकाणी दिवस-रात्र लोकांची वर्दळ असते. सहभागींसाठी चहा, नाश्ता, जेवण आणि इतर सोयीसुविधा पुरविल्या जातात. काही मंडळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास व्यक्ती नियुक्त केल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे हे ठिकाण केवळ मंडळाचे कार्यालय न राहता आर्थिक व्यवहारांचे केंद्र बनल्याची चर्चा आहे.

ग्रामीण भागातील बेरोजगार युवक अशा ठिकाणी सहज आकर्षित होतात. सुरुवातीला मनोरंजन किंवा वेळ घालविण्याचे साधन म्हणून सहभागी होणारे अनेक युवक पुढे पैशांच्या मोहात अडकतात. काही जण कर्जबाजारी होतात, तर काहींचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी समोर येतात. गावोगावी निर्माण झालेली ही परिस्थिती सामाजिक चिंतेचा विषय बनली आहे.

नागरिकांच्या मते, अशा मंडळांमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळीही असतात. त्यामुळे सामान्य नागरिक या ठिकाणांपासून दूर राहतात. काही गावांत यामुळे वाद-विवाद, भांडणे आणि आर्थिक व्यवहारांवरून तणाव वाढल्याच्या घटनाही घडल्याचे बोलले जाते.

सामाजिक कार्य आणि क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी निर्माण झालेल्या संस्थांचा वापर जर चुकीच्या कामांसाठी होत असेल, तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. त्यामुळे अशा मंडळांच्या प्रत्यक्ष कामकाजाची तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः युवकांच्या भवितव्याचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.


थोडे नवीन जरा जुने