पद नाही, सत्ता नाही तरीही जनसंपर्क, विकासदृष्टी आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाच्या बळावर उत्तम पाटील यांची राजकीय भरारी
अजित कांबळे | शिवार न्यूज नेटवर्क :
राजकारणात यशस्वी होण्यासाठी पद, सत्ता आणि अधिकार आवश्यक मानले जातात. परंतु काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांचे कार्यच त्यांची खरी ओळख बनते. निपाणी मतदारसंघात सध्या असेच एक नाव वेगाने चर्चेत आले आहे, ते म्हणजे युवा नेते उत्तम पाटील. कोणतेही संवैधानिक अथवा शासकीय पद नसताना केवळ जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि विकासकामांच्या जोरावर त्यांनी जनतेच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा आणि धार्मिक कार्याचा वारसा जपत उत्तम पाटील यांनी लोकांशी नाळ जोडण्याचे काम सातत्याने केले आहे. राजकीय लाभ किंवा पदाची अपेक्षा न ठेवता गावोगावी जाऊन सामान्य माणसांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेणे आणि विकासाच्या कामांसाठी सातत्याने प्रयत्न करणे, ही त्यांची कार्यशैली बनली आहे. त्यामुळे आज निपाणी मतदारसंघात त्यांची प्रतिमा एका राजकीय नेत्यापेक्षा अधिक, जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या नेतृत्वाची बनली आहे.
आजच्या स्पर्धात्मक राजकारणात अनेक नेते सत्तेच्या बळावर आपली छाप निर्माण करतात. मात्र उत्तम पाटील यांनी कोणतेही अधिकारपद नसताना समाजकारणाच्या माध्यमातून आपली ताकद सिद्ध केली आहे. गावागावांमध्ये कार्यकर्त्यांचे संघटन उभे करणे, युवकांना संधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधणे यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
शिक्षण, रोजगार, शेती, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांमुळे युवा वर्ग त्यांच्याकडे आशेने पाहू लागला आहे. युवकांसाठी रोजगार मेळावे, मार्गदर्शन शिबिरे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, शिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणे अशा विविध माध्यमांतून त्यांनी समाजजीवनात सक्रिय भूमिका बजावली आहे.
विशेष म्हणजे, विकासाच्या कामांमध्ये राजकारण न करता सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न लोकांना भावत आहे. त्यामुळे मतदारसंघातील अनेक गावांमध्ये युवक, शेतकरी आणि विविध सामाजिक घटकांचा त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
अलीकडेच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रभावी नेते डी. के. शिवकुमार यांची उत्तम पाटील यांनी बेंगळुरूमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर निपाणीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, आगामी वाटचाल आणि भविष्यातील घडामोडींवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निपाणीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागल्याची चर्चा रंगू लागली आहे.
जरी या चर्चांबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते आणि समर्थक आगामी काळात उत्तम पाटील यांची राजकीय भूमिका अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
कार्यकर्त्यांच्या अडचणींमध्ये धावून जाणारा, सामान्य माणसांच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे भूमिका घेणारा आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा नेता म्हणून उत्तम पाटील यांची प्रतिमा अधिकाधिक मजबूत होत आहे. त्यामुळेच आज निपाणी मतदारसंघात त्यांच्या नावाभोवती आशावादाचे वलय निर्माण झाले आहे.
राजकारणाच्या बदलत्या प्रवाहात जनतेच्या विश्वासाची शिदोरी आणि विकासाचा ध्यास घेऊन वाटचाल करणारे उत्तम पाटील हे नाव आगामी काळात निपाणीच्या राजकीय पटावर अधिक ठळकपणे उमटण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. जनसंपर्काची ताकद, समाजकारणाची ओढ आणि विकासाचा ध्यास यांची त्रिवेणी जुळल्याने निपाणीच्या राजकारणात एक नवा अध्याय आकार घेत असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
