मुंबई :
राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (FDA) सुरू असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे भेसळखोर, अवैध गुटखा विक्रेते, नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल चालक आणि औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या कठोर कारवाईचे राज्यभरातून स्वागत होत आहे.
या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील नेते व माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना एक आगळेवेगळे पत्र पाठवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांनी राज्यातील सर्व विभाग प्रमुखांना त्यांच्या कामातून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला आहे.
"एक बाटली रक्त सर्वांना वाटा"
सावजी यांनी पत्रात उपरोधिक शैलीत म्हटले आहे की, "तुकाराम मुंढे यांचे एक बाटली रक्त काढून ते थोडे थोडे राज्यातील सर्व खातेप्रमुखांना द्यावे. त्यामुळे त्यांच्यासारखी कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि काम करण्याची ऊर्जा इतर अधिकाऱ्यांमध्येही निर्माण होईल."
त्यांनी पुढे म्हटले आहे की, जसे अशक्त रुग्णाला रक्त देऊन सशक्त केले जाते, त्याचप्रमाणे मुंढे यांच्या कार्यतत्परतेची प्रेरणा राज्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळाली तर भ्रष्टाचार आणि भेसळीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवता येईल.
पत्र सोशल मीडियावर व्हायरल
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक आणि प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांवर केलेला हा खोचक टोला सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सावजी यांच्या पत्रामुळे पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीची राज्यभर चर्चा रंगली आहे.
