Top News

प्राथमिक शाळांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य; भौतिक सुविधांसाठी १० लाखांचा निधी देणार – अतिश शिंगे

संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क : 

जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मिळतात. ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने वडगाव येथील शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेच्या भौतिक सुविधांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे यांनी केले.

हातकणंगले तालुक्यातील वडगाव येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कस्तुरी पाटील होत्या.

यावेळी बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी म्हणाले, “जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळांमधूनच अनेक गुणवंत विद्यार्थी, अधिकारी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वे घडली आहेत. त्यामुळे या शाळांचे जतन आणि संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

शाळा प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे रंगीबेरंगी सजविलेल्या बैलगाडीतून गावातून वाजतगाजत स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. तसेच उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथही देण्यात आली.

यावेळी उपसरपंच स्वप्नील चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कांबरे, सुनील खारेपाटणे, रघुनाथ गोरड, नितीन घोरपडे, सुवर्णा सुतार, सविता सावंत, अविनाश पाटील, केंद्रप्रमुख शहाजी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर घुगरे, उपाध्यक्षा सन्मती लोंढे, मंगेश कांबरे, वासिक हजारी, सलमा हजारी, मुख्याध्यापिका छाया पाटील, राजेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बन्ने यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने