१० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत; सुदर्शन पाटील यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक
सुदर्शन पाटील / शिवार न्यूज नेटवर्क :
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असून कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या उमेद फाउंडेशनतर्फे सैनिक टाकळी येथील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून गावातून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे.
उमेद फाउंडेशनतर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. यंदाही १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आगाऊ शैक्षणिक किट उपलब्ध करून देण्यात आले.
सैनिक टाकळी येथे उमेद फाउंडेशनच्या कोल्हापूर विभागाचे सदस्य सुदर्शन पाटील यांच्या सहकार्याने १० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले. याचा लाभ कुमार विद्यामंदिर, कन्या विद्यामंदिर, छत्रपती संभाजीनगर शाळा, छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि गर्ल्स हायस्कूल येथील गरजू विद्यार्थ्यांना झाला.
या शैक्षणिक किटमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी शालेय सॅक, पाण्याची बाटली, हातरुमाल, वह्या, पेन, पेन्सिल, रबर, कंपास, चित्रकला वही तसेच इतर शैक्षणिक साहित्य समाविष्ट करण्यात आले होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
उमेद फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे. याशिवाय फाउंडेशनच्या ‘उमेद मायेचे घर’ या सामाजिक प्रकल्पाअंतर्गत कोपार्डे (सांगरूळ रोड) येथे गरीब, गरजू आणि अनाथ मुलांसाठी मोफत शिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यावेळी बोलताना सुदर्शन पाटील यांनी, "गावातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी उमेद फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. यापुढील काळातही हुशार, गरीब आणि अनाथ विद्यार्थ्यांना शक्य ती सर्व मदत करण्यात येईल," असे सांगितले.
शैक्षणिक किट वितरण कार्यक्रमावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी उमेद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गाताडे, शैक्षणिक पालकत्व मोहीम प्रमुख प्रदीप नाळे, सागर कासोटे तसेच कोल्हापूर विभागाचे सदस्य गौतम जिरगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शाळांच्या वतीने उमेद फाउंडेशन आणि सुदर्शन पाटील यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुरू असलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
