Top News

बोरगावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम उत्सव शांततेत संपन्न

 


अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :

बोरगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा मोहरम उत्सव यंदाही अत्यंत शांततापूर्ण, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत गुण्यागोविंदाने या उत्सवात सहभाग नोंदवून सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडविले.

मोहरम उत्सवानिमित्त गावातील धनगर गेट, अपराज गेट, कुंभार गेट, काली गेट, मिरजे गेट, माळी गल्ली, चावडी तसेच ग्रामदैवत असलेल्या बावा ढंग वली दर्गा परिसरात नालपीर पंजांची उभारणी करण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने उजळून निघाले होते.

पहाटेच्या सुमारास बावा ढंग वली दर्गा परिसरात सर्व धर्मीय बांधवांच्या उपस्थितीत पारंपरिक 'खाई' खेळण्यात आली. तसेच हजरत इमाम हसन व हजरत इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ करबला कवायती आणि विविध पारंपरिक खेळांचे गावभर सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली.

शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी मोहरमचा मुख्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी गावातील सर्व नालपीर पंजांची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ग्रामदैवत बावा ढंग वली दर्गा परिसरात पीर पंजांच्या गाठीभेटीचा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला.

मोहरम उत्सवातील तांबूत विसर्जनाला विशेष धार्मिक महत्त्व असून, सायंकाळी सर्व धर्मीय नागरिकांनी खारीक, खोबरे, गुलाल, अबीर-बुक्का उधळत डोलारगी (तांबूत)चे दर्शन घेतले. संपूर्ण उत्सव शांततेत व उत्साहात पार पडला.

उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदलगा पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

थोडे नवीन जरा जुने