Top News

शाहू विचारांचा जागर; शेडशाळ येथे शाहू जयंती उत्साहात, 'नशामुक्त भारत' अभियानातून जनजागृती

 


शेडशाळ । शिवार न्यूज नेटवर्क :

न्यू इंग्लिश स्कूल, शेडशाळ येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रीमती माणिक नागावे आणि क्रीडाश्री अब्दुल कादर देसाई यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक सुधारणांमधील योगदानाचा आढावा सादर केला. क्रीडाश्री अब्दुल कादर देसाई यांनी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत शिक्षण, सामाजिक समता आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून निरोगी व सुसंस्कृत जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले.

याचवेळी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्यचे कोल्हापूर जिल्हा संघटक श्री. सुरेश सकटे यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त भारत अभियान" अंतर्गत "आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी दिन" साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणारे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम याबाबत जनजागृती करत व्यसनविरोधी घोषणा देत परिसरात प्रभातफेरी काढली. तसेच सहाय्यक शिक्षक श्री. रियाज जमादार यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्ती व नशाबंदीची शपथ दिली.

या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाहू महाराजांचे विचार आणि व्यसनमुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

थोडे नवीन जरा जुने