शिरोळ । शिवार न्यूज नेटवर्क :
राज्यात मान्सून दाखल होऊनही शिरोळ तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी शेतीला दिलासा देणारा दमदार पाऊस अजूनही हुलकावणी देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या पुढील दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार, राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्यासाठी २ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा प्रभाव राहू शकतो. मात्र शिरोळ तालुक्यासह बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता सध्या कमी असल्याचे चित्र आहे.
आज (शुक्रवारी) कोल्हापूर जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, सलग आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता २ जुलैनंतरच अधिक असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून उगवलेल्या पिकांना आता पावसाची नितांत गरज आहे. हलक्या सरींमुळे जमिनीचा वरचा थर ओलसर होत असला तरी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ओलावा मिळत नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून त्यानंतर शिरोळ तालुक्यातही समाधानकारक पाऊस होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत मात्र तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना "आला पाऊस... गेला पाऊस!" अशीच परिस्थिती अनुभवावी लागणार आहे.
