एनसीसी, क्रीडा आणि शिक्षणातील सातत्यपूर्ण यशाला मिळाले देशसेवेचे सुवर्णफळ
हेरवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील प्रसन्न प्रभाकर शेडबाळे याची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिद्द, चिकाटी, शिस्तबद्ध जीवनशैली आणि देशसेवेची प्रबळ इच्छा यांच्या जोरावर प्रसन्नने हे यश संपादन करत युवकांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
प्रसन्न याने आपले प्राथमिक शिक्षण प्राथमिक विद्या मंदिर, कुरुंदवाड येथे पूर्ण केले. त्यानंतर सीताबाई पटवर्धन हायस्कूल, कुरुंदवाड येथे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय जीवनातच त्याने राष्ट्रीय छात्र सेना (NCC) मध्ये सहभाग घेत ‘A’ प्रमाणपत्र मिळवून आपली नेतृत्वक्षमता आणि शिस्त सिद्ध केली. त्यांचे आजोबा माजी सैनिक असून सैनिकांची परंपरा प्रसन्नने पुढे सुरू ठेवली आहे.
पुढे सहकारभूषण एस. के. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड येथे अकरावी-बारावीचे शिक्षण घेत असताना त्याने एनसीसीची वाटचाल सुरू ठेवत ‘B’ आणि ‘C’ प्रमाणपत्रे प्राप्त केली. याच काळात सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न त्याने मनाशी बाळगले होते.
उच्च शिक्षणासाठी त्याने सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. व्हॉलीबॉल खेळात राज्यस्तरीय पातळीवर प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली.
एनसीसीमधील प्रशिक्षण, क्रीडा क्षेत्रातील मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर प्रसन्नने भारतीय सैन्यदलाच्या भरती प्रक्रियेत यश मिळवत देशसेवेची संधी प्राप्त केली आहे. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार तसेच कुरुंदवाड परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रसन्न शेडबाळे याची भारतीय सैन्यदलातील निवड ही केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण हेरवाड गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
