हैदरअली मुजावर । शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण गावात मोहरमच्या दहाव्या दिवशी धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि बंधुभावाचे दर्शन घडवणारा सर्व पीरांच्या सवारींच्या भेटीचा सोहळा उत्साहात पार पडला. गावातील विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या सर्व पीरांच्या सवारी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने एकमेकांना भेटल्या. हा भाविकांसाठी अत्यंत आकर्षणाचा आणि श्रद्धेचा क्षण ठरला.
सर्व सवारींच्या भेटी मुश्किले आसान बाबा दर्गा येथे संपन्न झाल्या. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. ढोल-ताशांच्या दणदणाटात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सवारींचे स्वागत करण्यात आले. अबिराची उधळण होताच संपूर्ण शिरढोण नगरी पिवळ्या रंगात न्हाऊन निघाली आणि वातावरण भक्तिमय झाले.
विशेष म्हणजे, लहान बालचमूंनीही ढोल-ताशांच्या तालावर उत्साहाने सहभाग घेत मोहरमचा नाद घुमवला. गावातील सर्व धर्मीय नागरिकांनी एकोप्याने व उत्साहात या सोहळ्यात सहभागी होत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
मोहरमच्या दहाव्या दिवशी झालेल्या या पारंपरिक भेटीच्या कार्यक्रमामुळे शिरढोणमध्ये भक्ती, श्रद्धा आणि बंधुभावाचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा मोहरम सोहळा संस्मरणीय ठरला.
शिवार न्युजसाठी प्रतिनिधी हैदरअली मुजावर शिरढोण
