अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव-आयको रोडवरील भाऊचा धाबा शेजारी असलेल्या मोशिन मोकाशी यांच्या शेतातील विहिरीत एका अज्ञात तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे, उंची सुमारे ५ फूट ६ इंच असून त्याच्या उजव्या हातावर सिंहाचे गोंदण आहे. मृताच्या अंगात केशरी रंगाचा टी-शर्ट आणि मिलिटरी रंगाची पॅन्ट असल्याचे आढळून आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह गेल्या काही दिवसांपासून विहिरीच्या पाण्यात असल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून, त्याची ओळख पटविणे कठीण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सरदार सनदी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील प्रक्रिया व शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास सदलगा पोलीस करत असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा ओळख पटत असल्यास सदलगा पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
