शिरोळ । शिवार न्यूज नेटवर्क :
सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे दिग्विजय माने यांना महाराष्ट्र शासनमान्य स्किल इन्फोटेक अकॅडमीच्या वतीने ‘युवा गौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अकॅडमीच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या युवा व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिग्विजय माने यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "स्किल इन्फोटेक अकॅडमीने पहिल्याच वर्षी या पुरस्कारासाठी माझी निवड करून माझ्यावर जो विश्वास दाखविला, त्याबद्दल मी संपूर्ण स्किल इन्फोटेक परिवाराचा मनापासून ऋणी आहे. हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या कार्यप्रवासात कायम साथ देणारे माझे कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजातील सर्व हितचिंतक यांचा आहे. मी हा पुरस्कार त्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून स्वीकारत आहे. हा पुरस्कार मला सामाजिक कार्य अधिक जोमाने करण्यासाठी नवी ऊर्जा, प्रेरणा आणि चेतना देणारा ठरेल. भविष्यातही सर्वांचे प्रेम, सहकार्य आणि मार्गदर्शन असेच लाभत राहावे, हीच अपेक्षा आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास नगराध्यक्षा योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, नगरसेवक सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी स्किल इन्फोटेक अकॅडमीचे प्रमुख चैतन्य पाटील, दळवी, विकी शिंदे, पृथ्वीराज शिंदे, सत्यजित मोरे, दिगंबर इंगळे, शिवराज ठोंबरे, अभिजीत पडतारे, प्रेम कांबळे, गणेश कोरवी, सौरभ काळे, प्रतीक संकपाळ, किरण माने, रितेश कोळी, निलेश सुतार, श्रेणीक माने, गुरुदत्त गंगधर तसेच स्किल इन्फोटेक अकॅडमीच्या सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक व परिवारातील सदस्य उपस्थित होते.
दिग्विजय माने यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
