Top News

१० हजार जणांना मिळणार रोजगारांची संधी ; आमदार यड्रावकरांच्या पाठपुराव्याला मोठे यश

टाकळी येथे एमआयडीसीसाठी ४७.६३ हेक्टर जमीन मंजूर


जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, मौजे टाकळी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) उभारणीसाठी ४७.६३ हेक्टर शासकीय व गायरान जमीन उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिरोळ तालुक्याच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला असून रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

मौजे टाकळी येथील गट क्रमांक १३५० मधील १२.८६ हेक्टर गायरान जमीन, १५ हेक्टर शासकीय जमीन तसेच गट क्रमांक ११९४ मधील १९.७७ हेक्टर गायरान जमीन अशा एकूण ४७.६३ हेक्टर क्षेत्रावर नव्या एमआयडीसीची उभारणी होणार आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आकर्षित होऊन स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीदरम्यान शिरोळ तालुक्यात स्वतंत्र एमआयडीसी उभारण्याचे आश्वासन आमदार यड्रावकर यांनी दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग व महसूल विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी हा विषय मार्गी लावला. अखेर मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे त्यांच्या शब्दाला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप मिळाले आहे.

या एमआयडीसीमुळे सुमारे १० हजारांहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासोबतच महिलांसाठी गारमेंटच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. नुकतेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही महिलांसाठी स्वतंत्र गारमेंट क्लस्टर योजना मंजूर करण्याची ग्वाही दिली होती. या क्लस्टरमुळे हजारो महिलांना त्यांच्या परिसरातच रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.

याबाबत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र एमआयडीसीची आवश्यकता होती. तालुक्यातील युवकांना रोजगारासाठी दूरवर जावे लागू नये, तसेच महिलांनाही स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा प्रयत्न केला. एमआयडीसीमुळे उद्योग, रोजगार आणि आर्थिक विकासाचा नवा अध्याय सुरू होईल. गारमेंट क्लस्टरमुळे महिलांच्या हाताला काम मिळून हजारो कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टाकळी एमआयडीसी आणि प्रस्तावित गारमेंट क्लस्टरमुळे शिरोळ तालुक्यात उद्योगांची नवी दालने खुली होणार आहेत. युवकांसाठी रोजगार, महिलांसाठी स्वावलंबन आणि तालुक्यासाठी आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग या निर्णयातून खुला झाला आहे.

या ऐतिहासिक निर्णयानंतर आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

थोडे नवीन जरा जुने