अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :
विद्युत वितरण व्यवस्थेचे खाजगीकरण करण्याच्या हालचाली तातडीने थांबवून वीजपुरवठा शासनाच्या नियंत्रणाखालीच ठेवावा, अन्यथा बोरगाव टेक्सटाईल पार्कमधील उद्योजक, व्यापारी आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी दिला. बोरगाव येथील टेक्सटाईल पार्कमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना शरद जंगटे म्हणाले की, सध्या टेक्सटाईल उद्योग मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि मंदीच्या परिस्थितीमुळे अनेक उद्योग अडचणीत सापडले असून काही उद्योगांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून पुरविण्यात येणारा वीजपुरवठा खाजगी कंपनीकडे हस्तांतरित करण्याची चर्चा सुरू आहे. हा निर्णय उद्योगांसाठी घातक ठरणारा आहे.
"आधीच वाढलेल्या वीजदरांमुळे आणि थकीत वीजबिलांमुळे उद्योजक त्रस्त आहेत. त्यातच वीजपुरवठ्याचे खाजगीकरण झाल्यास वीजदर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक लघु व मध्यम उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर जातील. अनेक उद्योजकांवर आर्थिक संकट कोसळेल," अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, "वीज वितरण व्यवस्थेचे खाजगीकरण हे केवळ उद्योगधंद्यांसाठीच नव्हे तर शेतकऱ्यांसाठीही घातक आहे. हा निर्णय उद्योग आणि शेती क्षेत्राच्या कंबरड्यावर घाव घालणारा ठरू शकतो. त्यामुळे शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा उद्योजक, व्यापारी आणि शेतकरी यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल."
उद्योगधंदे टिकले पाहिजेत, त्यांना नवसंजीवनी मिळाली पाहिजे आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला पाहिजे, या उद्देशाने सर्व घटकांनी एकत्र येऊन या निर्णयाविरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचेही जंगटे यांनी नमूद केले.
यावेळी उद्योजक रमेश गेवारे, भारती सातपुते, भूपाल महाजन, बी. के. महाजन, दिलीप महाजन, सचिन कोळी, राजू पाटील, महावीर पाटील, रावसाहेब चौगुले यांच्यासह बोरगाव टेक्सटाईल पार्कमधील उद्योजक, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
