विद्यार्थी, शेतकरी व वाहनचालक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी
अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :
कोट्यवधी रुपये खर्च करून अवघ्या काही वर्षांपूर्वी खडीकरण, डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यात आलेला कसनाळ-बोरगाववाडी रस्ता आज पूर्णतः खड्डेमय झाला असून वाहनचालक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. त्यामुळे "खड्ड्यात गेलेला रस्ता खड्ड्याबाहेर कोण काढणार?" असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गाच्या खडीकरण, डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी २०१७ साली साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तब्बल ३ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. २५ जुलै २०१७ रोजी कामास प्रारंभ होऊन २४ जून २०१८ रोजी काम पूर्ण झाले. मंजूर निधीतून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते.
मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर पाचव्या व सहाव्या वर्षी संबंधित ठेकेदारामार्फत रस्त्याची देखभाल व आवश्यकतेनुसार पुनःडांबरीकरण होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात अशी कोणतीही कामे झालेली दिसून येत नसल्याची चर्चा शेतकरी व नागरिकांमध्ये सुरू आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांना आपला माल जवळच्या इचलकरंजी कृषी उत्पन्न बाजार समितीत नेण्यासाठी हा महत्त्वाचा आणि जवळचा मार्ग आहे. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीचा खर्च वाढत असून वेळेचाही अपव्यय होत आहे. वाहनचालकांनाही खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
याच मार्गालगत शाळा असल्याने विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालक वर्गातूनही या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे.
‘नम्म ग्राम-नम्म रस्ते’ योजनेअंतर्गत हा रस्ता विकसित करण्यात आला होता. मात्र आज त्याची झालेली दुरवस्था पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून रस्त्याचे मजबुतीकरण करावे, खड्डे बुजवून वाहतुकीस सुरक्षित व सुलभ करावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
