शिरोळ । शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ येथील ओएसिस ॲग्रो इंडस्ट्रीज व ओएसिस जैव नियंत्रण प्रयोगशाळेचे प्रमुख प्रवीण चंद्रकांत माळी यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार’ जाहीर झाला आहे. जैविक आणि विषमुक्त शेतीच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचा मार्ग निर्माण करत प्रवीण माळी यांनी शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबविले. रासायनिक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन त्यांनी जैविक शेतीचा प्रचार-प्रसार करण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी ओएसिस ॲग्रो इंडस्ट्रीज व ओएसिस जैव नियंत्रण प्रयोगशाळेची स्थापना करून शेतकऱ्यांना सेंद्रिय व पर्यावरणपूरक शेतीसाठी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.
त्यांच्या प्रेरणेतून अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर, जमिनीचे आरोग्य संवर्धन, ऑरगॅनिक कार्बन वाढविणे आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब केला आहे. परिणामी उत्पादन खर्चात बचत होऊन सुरक्षित, दर्जेदार आणि विषमुक्त अन्न उत्पादनाला चालना मिळाली आहे.
प्रवीण माळी यांच्या प्रयोगशील वृत्ती, शेतीबद्दलची तळमळ, संशोधनाची आवड आणि शेतकरीहिताच्या कार्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा मार्ग दाखविणाऱ्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्य शासनाने हा मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे.
लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या समारंभात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, पुरस्कार जाहीर होताच शेतकरी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध संस्था तसेच मित्रपरिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
