जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि सर्वांगीण विकासाच्या विचारातूनच जयसिंगपूर शहराची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या दूरदृष्टीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, विविध विकासकामांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहर स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत आहे. आगामी काळातही शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
जयसिंगपूर येथील क्रांती चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते.
आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, शाहू महाराजांनी शिक्षण, आरक्षण, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित समाजासाठी घेतलेले निर्णय आजही प्रेरणादायी आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा विचार आपल्या कार्याची दिशा ठरवत आहे. जयसिंगपूर शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडविणारा असावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी आपले जनकपिता श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या नावाने वसवलेल्या जयसिंगपूर शहरात सध्या सुमारे २८० कोटी रुपयांची विविध विकासकामे अंतिम टप्प्यात आहेत. या शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख अधिक बळकट करण्याबरोबरच आधुनिक सुविधांनी युक्त शहर म्हणून देशभरात वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, नगरसेविका गिरमल कोळी, तेजश्री पाटील, रुपाली बंडगर, सचिन चौगुले, मिनल नांद्रेकर, सचिन निटवे, शकुंतला मछले, लक्ष्मण गोसावी, बजरंग खामकर, महेश कलकुटगी, स्वाती मादनाईक, उज्वला वाघवेकर, पराग पाटील, अशोक मळगे, तबसुम फरास, अर्जुन देशमुख, गिता भोसले, अर्चना आडगाणे, शितल गतारे, प्रविण बलदवा, लता गाडेकर यांच्यासह शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
