अनिल जासूद । शिवार न्यूज नेटवर्क :
जिल्हा परिषदेच्या नव्या कार्यकाळातील पहिल्याच सर्वसाधारण सभेत शिरोळ तालुक्यातील आलास जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापूरे यांनी विविध लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. शिक्षण व्यवस्था, महापूरग्रस्त भागातील रस्त्यांची दुरुस्ती आणि गावांतील सांडपाण्याच्या समस्येसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सभागृहात ठोस भूमिका मांडली.
सभेत बोलताना प्रशांत शहापूर यांनी जिल्हा परिषद शाळांबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घ्यावे, यासाठी जिल्हा परिषदेत ठराव करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. "ज्यांच्यावर शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांची मुले जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकली तर त्या शाळांचा दर्जा अधिक उंचावेल आणि सर्वसामान्य पालकांचाही या शाळांवरील विश्वास वाढेल," असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील महापुराच्या समस्येकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले. दरवर्षी महापुराचा मोठा फटका बसत असल्याने महापुरातून बाहेर पडण्यासाठी असलेले रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असून ती तातडीने दुरुस्त करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करावा आणि दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी सभापती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली.
याशिवाय गावागावांतील सांडपाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विशेष योजना राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सभागृहात नमूद केले.
पहिल्याच सर्वसाधारण सभेत लोकहिताचे आणि विकासाशी निगडित विविध प्रश्न ठामपणे मांडत प्रशांत शहापूरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
